चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचे पीएसआय अन्नपूर्णा यांनी केले एन्काऊंटर
बंगळूरू : खरा पंचनामा
हुबळी जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचे रविवारी (ता. १३) एन्काऊंटर करण्यात आले आहे. आरोपीला अटक करून घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. हे एन्काऊंटर एका महिला अधिकाऱ्याने केले असून, पीएसआय अन्नपूर्णा असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
रितेश कुमार (वय ३५, रा. पाटणा, बिहार) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याअंतर्गत हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केली. ही घटना हुबळी येथील अशोक नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह एका मोकळ्या इमारतीत सापडला.
हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितले की, 'सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याची तीन ते चार तास चौकशी करण्यात आली. पण त्याने खूप कमी माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो गुन्हा करताना स्पष्टपणे दिसून येत होता. मात्र तरीही तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. आरोपी जिथे काम मिळेल तिथे तो काम करायचा. दोन ते तीन महिन्यांपूर्वीच तो हुबळी येथे आला होता आणि तारिहाला अंडरपासजवळील एका रिकाम्या इमारतीत तो राहत होता. त्याची ओळख पटवण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तो जिथे राहत होता तिथे त्याला नेण्यात आले. यावेळी त्याने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. अधिकाऱ्यांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला अधिकारी पीएसआय अन्नपूर्णा यांनी आरोपीला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण तो थांबला नाही, तेव्हा अन्नपूर्णा यांनी त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. ज्यातली एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि दुसरी त्याच्या पाठीला लागली."
दरम्यान, या एन्काऊंटरमध्ये आरोपी बेशुद्ध पडला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत पीएसआय अन्नपूर्णा आणि यशवंत आणि वीरेश हे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत पण त्यांची प्रकृती स्थिर आहे, असेही पोलिस आयुक्त एन शशीकुमार यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.