कुरुंदकरला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचाही आता लागणार 'निकाल'?
वकिलांनी न्यायालयाला नावे दिली
ठाणे : खरा पंचनामा
सहाय्यक पोलीस निरीक्षक बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयात हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी कुरुंदकरला वाचवण्यासाठी जीवाचा मोठा अटापिटा केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आरोपींना अटक केली. कुरुंदकरच्या विरोधात इतक्या गंभीर गुन्ह्याची नोंद असताना त्याच्या नावाची शिफारस राष्ट्रपती पदकासाठी करण्यात आली. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी कुरुंदकरची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निवेदन न्यायालयाला सादर करण्याच्या सूचना सरकारी वकील प्रदीप घरत यांना केल्या. त्यानुसार घरत यांनी आरोपींना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे न्यायालयाला दिली आहेत.
अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 रोजी झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने अत्यंत निघृण पद्धतीने अश्विनी यांना मारले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे लाकडे कापण्याच्या कटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिले. 14 जुलै 2016 रोजी याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झाली. त्यानंतर 31 जानेवारी 2017 रोजी अभय कुरुंदकर याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. कुरुंदकर हा पोलीस दलाचा लाडका अधिकारी असल्यामुळे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुरुंदकर गायब झाला तो थेट ऑक्टोबर 2017 मध्ये उगवला. त्यानंतर ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याला बिनबोभाट सेवेत दाखल करून घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने कुरुंदकरला अटक झाली. या घडामोडीवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी नाराजी व्यक्त केली. आरोपीची पाठराखण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात निवेदन सादर करण्याच्या सूचना त्यांनी अॅड. प्रदीप घरत यांना दिल्या. त्यानुसार नुकत्याच झालेल्या सुनावणीला कुरुंदकर आणि अन्य आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे न्यायालयाला सादर केली आहेत.
अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यावर कारवाई व्हावी यासाठी कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो सोडल्या तर बाकीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फार हैराण केले. संपूर्ण पोलीस दलाचा आरोपीला मदत करण्यासाठी जीवाचा अटापिटा सुरू होता. असा प्रकार इतर गुन्ह्यात घडू नये यासाठी कुरुंदकरला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.