अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
टेक्सास (अमेरिका) : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातासमुद्रापार अमेरिकेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ऑस्टिनच्या 'महाराष्ट्र माझा' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या सोहळ्यात दीडशेहून अधिक कलाकारांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या वेळी भगवा झेंडाही कॅपिटॉल बिल्डिंगसमोर फडकला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी 'महाराष्ट्र माझा'चे अध्यक्ष विनय उबाळे, उपाध्यक्ष महेश जडे, सचिव संयोगिता ताटे, खजिनदार राजेश कुलकर्णी, प्रसिद्धीप्रमुख सचिन कापसे, पॅन-इंडिया कार्यक्रमांचे संयोजक जितेंद्र ताटे, सर्व समिती आणि बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमात ऑस्टिन पंजाबी कल्चरल असोसिएशन, शिवगर्जना डान्स अकादमी, तेलगू कल्चरल असोसिएशन, ग्रेटर बंगाली बंगोबासी या संस्थांच्या कलाकारांनी कला सादर केली. महाराष्ट्र माझाच्या संदेश गायकवाड यांनी संबळवादन सादर केले. कार्यक्रमाचा समारोप ढोलताशा वादनाने झाली.
यादरम्यान बालकलाकारांनी शंभूराजे आणि जिजाऊ माँसाहेब असा पोशाख करून मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीची सांगता 'महाराष्ट्र माझा'च्या कलाकारांनी सादर केलेल्या ढोल ताशा यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली.
अमेरिकेत महाराष्ट्राचे पारंपारिक ढोल, ताशा, झांज, लेझीम या पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी २०१८ मध्ये 'महाराष्ट्र माझा' संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था शिवजयंती, होळीचा सण, भारतीय स्वातंत्र्यदिन, ४ जुलै अमेरिकी स्वातंत्र्यदिन, गणपती उत्सव, दांडिया, आणि दिवाळी पहाटसारख्या अनेक कार्यक्रमांत ढोल-ताशांचे सादरीकरण करते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.