फुकट मावा, सिगरेट मागितल्याने केला गुंड समीर नदाफचा गेम
रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कुपवाड येथील सराईत गुंड आणि एका कुख्यात टोळीचा सदस्य असलेल्याचा फुकट मावा, गुटखा, सिगरेट मागत असल्याने पोटावर, मानेवर, पाठीवर सपासप वार करून सोमवारी रात्री उशिरा खून करण्यात आला होता. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
समीर रमजान नदाफ (वय ४१, रा. रॉयल सिटी मारवा आपर्टमेंट, कुपवाड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोहेल सलीम काझी (वय ३०, रा. खारे मळा चौक, कुपवाड), सोहेल ऊर्फ साबीर शरीफ मुकादम (वय २६, रा. बडेपिर कॉलनी, जुना मिरज रोड, कुपवाड) यांना अटक करण्यात आली आहे. मृत समीर नदाफ एका कुख्यात टोळीचा सदस्य होता तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तो संशयित सोहेल काझी याच्या पान पट्टीवर जाऊन मावा, गुटखा, सिगरेट घेत होता. त्याच्या पैशाबाबत विचारल्यावर दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही देत होता. त्याच्या या वागण्याला सोहेल कंटाळला होता.
सोमवारी रात्रीही समीर त्याच्या पान पट्टीवर गेला. त्यावेळी त्याने पुन्हा फुकट मावा आणि सिगरेट मागितली. त्यावेळी काझी आणि मुकादम यांनी त्याला दारू पाजतो असे सांगून सावळी येथील आरटीओ कार्यालयाजवळील मैदानावर नेले. तेथे समीरवर दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या मानेवर, पाठीवर, पोटावर सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर दोघे निघून गेले.
याची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची माहिती घेत असताना एलसीबीचे सागर लवटे, संदीप गुरव यांना समीरचा खून काझी आणि मुकादम यांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर जुना मिरज रस्त्यावरील बडेपीर दर्गा परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी समीर नेहमी फुकट मावा, गुटखा, सिगरेट घेत होता. उधारीही देत नव्हता. पैसे मागितल्यावर दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्याचा खून केल्याची कबुली दिली. दोघांनाही कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील सोहेल काझी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संकेत मगदुम, अतुल माने, आमसिद्धा खोत, रणजित जाधव, अनंत कुडाळकर, उदयसिंग माळी, रोहन घस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.