'आता शाळेत भाजीपालाही विकायला आणा'
नंदुरबार : खरा पंचनामा
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पदभार स्वीकारल्यावर विविध शाळांना भेटींचा धडाका लावला आहे. आता त्यांनी एक नवा प्रयोग राबविण्याचा निश्चय केला. त्यामुळे शिक्षकांना तो प्रयोग कितपत मानवतो हा चर्चेचा विषय आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे शैक्षणिक आढावा बैठक झाली. या बैठकीला स्थानिक आमदार आणि विविध राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मंत्री भुसे यांनी विविध कामांचा आढावा घेतला.
यावेळी शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेगळाच उपक्रम सांगितला. गावातील आणि शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना शिकवावे. त्यांचा अभ्यास करून घ्यावा. पालकांनी देखील किमान अर्धा तास आपल्या पाल्यांची चर्चा करून त्यांचा अभ्यासक्रम समजून घ्यावा. आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करावे, असे आवाहन केले.
शासकीय शाळांचा दर्जा सुधारण्यावर मंत्री भुसे यांनी भर दिला. म्हणाले, प्रत्येक शाळेतील स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा असली पाहिजे. त्यासाठी केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शाळांना भेटी देऊन त्याचा आढावा घ्यावा. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळेल याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी शासन वेळेआधीच निधी उपलब्ध करून देईल.
प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी पिंक रूम असावी. ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पिकणारा भाजीपाला शाळेत विक्रीसाठी आणावा. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच जीवन उपयोगी ज्ञान देखील शाळेत दिले गेले पाहिजे, असे मंत्री म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी पदभार स्वीकारल्यावर सुरुवातीपासूनच विविध शाळांना भेटी देण्यावर भर दिला होता. या भेटीतून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संवाद वाढविण्यावर त्यांचा भर होता. आता त्यांनी थेट विद्यार्थी आणि पालकांनाच विविध सूचना केल्या आहेत. या सूचना शिक्षकांना मानवतील का हा चर्चेचा विषय आहे. मंत्र्यांच्या या कल्पना कितपत प्रत्यक्षात उतरतील यावर खुद्द शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाच साशंकता वाटू शकते. त्यामुळे नंदुरबार येथे झालेली शिक्षण मंत्री भुसे यांची बैठक चांगलीच चर्चेचा विषय आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.