सिग्नलची तार कापून सांगली-परळी पॅसेंजरवर दगडफेक
चौघे जखमी, रेल्वेतून पळवली सांगलीच्या प्रवाशाची बॅग
कुर्डुवाडी : खरा पंचनामा
सिग्नलची तार कट करून सांगली-परळी पॅसेंजर थांबवून चोरट्यांनी गाडीवर दगडफेक करत, एका प्रवाशाची बॅग लांबवली. या दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार (ता. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास कुडुवाडी रेल्वे स्थानकाजवळील डाऊन सिग्नलजवळ घडली. याबाबत रेल्वे प्रवासी धनंजय सावंत (रा. जत, जि. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडुवाडी रेल्वे पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी हे सांगली-परळी पॅसेंजरने जत ते लातूर असा प्रवास करत होते. कुडुवाडी रेल्वे स्थानकापासून दोन ते अडीच किमी अंतरावर डाऊन सिग्नलची तार चोरट्यांनी कट केली. त्यामुळे गाडी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सिग्नलजवळ थांबली. दोन चोरट्यांनी गाडीवर दगडफेक केली. गाडीत गर्दी असल्याने फिर्यादी डब्याच्या दरवाजाजवळ बसलेले होते.
दगड लागताच जखमी फिर्यादी बचावासाठी डब्याच्या आत पळाले, तेवढ्यात दरवाजामध्ये ठेवलेली त्यांची मोबाईल व कागदपत्रे असा ५ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेली. या दगडफेकीत फिर्यादीजवळ बसलेले प्रवासी संतोष गेंद (रा. सावरगाव ता. पुसद जि. यवतमाळ), शेजारील डब्यात बसलेले केरबा लवटे (रा. आनंदवाडी ता. पालम जि. परभणी), तुळशीराम शिंदे (रा. जिंती, ता. करमाळा) हे प्रवासी जखमी झाले आहेत.
गाडी कुर्दुवाडी रेल्वे स्थानकावर येताच जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रेल्वे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर बाबींची रेल्वे पोलिस तपासणी करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.