कोणाला माफ करू नका!
न्यायाधीशांसमोरच अश्विनी बिद्रेची मुलगी ढसाढसा रडली
ठाणे : खरा पंचनामा
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकाडातील आरोपींना पनवेल सत्र न्यायालयाकडून आज शिक्षा सुनावली जाणार आहे. ११ एप्रिल २०१६ मध्ये बिद्रे यांची हत्या झाली होती. अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे सात वर्षे या हत्याकांडाचा खटला सुरू होता. ठोस पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना दोषी ठरवले. राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. आज पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार आरोपींना शिक्षा सुनावणार आहेत.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. शिक्षेची सुनावणी सुरू झाली. खटल्याचा निकाल काय लागतो हे ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती. बिद्रे यांची मुलगी सिद्धीला न्यायाधीशांनी पुढे बोलावून घेतले. तिची माहिती विचारली. आई बेपत्ता झाली, त्यावेळी तू किती वर्षांची होती,अशी विचारणा केली. त्यावर मी सहा वर्षांची होते, असं सिद्धीने सांगितले. या खटल्याची माहिती तुला किती आहे आणि तुला नुकसान भरपाई किती मिळाली, असाही प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. त्यावर सिद्धीने न्यायाधीशांचे आभार मानले. आम्हाला या प्रकरणात खूप त्रास झाला. आम्हाला न्याय मिळावा, अशी विनंती तिने केली.
बिद्रे खून खटल्याच्या सुनावणीवेळी सिद्धीनं न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. आम्हाला या प्रकरणात प्रचंड त्रास झाला. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या कुटुंबातील सगळ्यांना त्रास झाला. माझी आई पोलीस अधिकारी होती, त्याचा मला अभिमान आहे. कोणालाही माफ करू नका. कोणी कोणाला मारू शकत नाही. शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, असं सांगतानाच सिद्धीला अश्रू अनावर झाले. ती भरकोर्टात रडू लागली. काही झालं तरी माझी आई आहे. माझी आई आता नाही, असं सांगताच संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. मलाही पोलीस व्हायचे आहे. पण महिलांना पोलीस दलात रिस्पेक्ट (आदर) नाही. स्त्रीला मान दिला जात नाही, अशी खंतही या मुलीनं बोलून दाखवली.
सुनावणी दरम्यान अश्विनीचे वडील जयकुमार बिद्रे बोलत होते. मी माजी सैनिक असून, कोणताही भेदभाव न करता माझ्या मुलांना मी शिक्षण दिले. माझ्या मुलीचे वाईट झाले. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे जयकुमार म्हणाले. त्यावर या प्रकरणात तुमचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या व्यक्तीला काय शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटते, असं न्यायाधीशांनी विचारलं.
अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनीही न्यायालयात माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला मदत केली. एक व्यक्ती माफीची साक्षीदार होणार होती. मात्र, एका अधिकाऱ्याने तसे होऊ दिले नाही. आम्हाला काही अपेक्षा नाही. मुलीच्या शिक्षणासाठी जो खर्च आहे, तो आईच्या पगारातून द्यावा. सर्व पोलिसांनी आरोपीला मदत केली, असं आहे आपलं पोलीस दल. आजपर्यंत एकही पोलीस अधिकारी माझ्या घरी आला नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आम्ही खूप त्रासात दिवस काढले आहेत. माध्यमांनी आम्हाला सहकार्य केल्याने हा खटला भक्कम झाला, असंही त्यांनी सांगितले.
यावेळी आरोपी अभय कुरुंदकर यानेही न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मी गुन्हा केला नाही, असं तो म्हणाला. त्यावर न्यायाधीशांनी त्याला झापलं. आता ते सांगू नका, ती वेळ गेली, असं न्यायाधीश म्हणाले. यावेळी अॅड प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. ५० वर्षे वयाच्या अधिकाऱ्याने त्याच्या मुलांच्या वयाच्या मुलीची क्रूर हत्या केली. पोलिसांना समाजात मान आणि त्यांच्याबद्दल विश्वास असतो. पण आरोपीने समाजाचा विश्वासघात केला आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या करून तुकडे केले जातात. मग हे पोलीस समाजाला काय न्याय देणार. हा खटला दुर्मिळ आहे, असं ते म्हणाले. आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.