पुणे शहरात नवे अपर पोलिस आयुक्त, सहा पोलिस उपायुक्त मिळणार
आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती
पुणे : खरा पंचनामा
शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने सहाव्या परिमंडलाची निर्मिती करण्यात येणार आहे. तर वाहतूक विभागासाठी एक अपर पोलिस आयुक्त आणि नवीन सहा पोलिस उपायुक्त देखील मिळणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच तो पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे ग्रामीण पोलिसांकडील लोणीकंद आणि लोणी काळभोर ही दोन पोलिस ठाणी 23 मार्च 2021 पासून पुणे शहर पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली. तर 11 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकाचवेळी डिजीटल माध्यमाद्वारे नवीन सात पोलिस ठाण्यांचे उद्घाटन करण्यात आले.
भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, चतुः श्रृंगी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून, तर पुणे ग्रामीणमधील हवेली या पोलिस ठाण्यांचा काही भाग समाविष्ट करून आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ या नवीन सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे काही परिमंडलामध्ये कमी तर काहीमध्ये जास्त पोलिस ठाण्यांचा समावेश झाला.
पोलिस उपायुक्तांच्या कामातील सुसूत्रता, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या सर्व पोलिस ठाण्यांची विभागणी करून नव्याने सहाव्या परिमंडळाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वी असलेल्या पाच परिमंडलाची देखील पुनर्रचना करावी लागणार आहे. सद्यः स्थितीला परिमंडल चारच्या हद्दीत सर्वाधिक पोलिस ठाणी येतात. या परिमंडलाची हद्द लोणीकंदपासून बाणेर पोलिस ठाण्यापर्यंत पोहचलेली आहे.
तर दुसरीकडे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. त्यामुळे जसे परिमंडलाला अपर पोलिस आयुक्त आहेत, तसेच वाहतूक विभागाला देखील एक नवे अपर पोलिस आयुक्त मिळणार आहेत. सध्या अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील ही अतिरिक्त जिम्मेदारी पार पाडत आहेत. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे.
त्यानुसार गुन्हेगारीत सुद्धा वाढ होताना दिसून येत आहे. तसेच शहरात महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे वाढत आहेत. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, विशेष शाखा, सायबर, मुख्यालय असे सहा नवे पोलिस उपायुक्त मिळणार आहेत. या प्रस्तावामध्ये सायबर पोलिस ठाण्याला अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी देखील गृहविभागाकडे करण्यात आली आहे.
असे असणार सहा पोलिस उपायुक्त
• पोलिस मुख्यालयासाठी एक अतिरिक्त पोलिस उपायुक्त
• गुन्हे शाखेसाठी एक अतिरिक्त पोलिस उपायुक्त
• विशेष शाखेसाठी एक अतिरिक्त पोलिस उपायुक्त
• वाहतूक शाखेसाठी एक अतिरिक्त पोलिस उपायुक्त
• सायबर सेलसाठी स्वतंत्र पोलिस उपायुक्त
• नवीन झोनसाठी स्वतंत्र पोलिस उपायुक्त
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.