Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांजा वाहतूक करणाऱ्या मोटारीने पोलीस उपनिरीक्षकास फरपटत नेले

गांजा वाहतूक करणाऱ्या मोटारीने पोलीस उपनिरीक्षकास फरपटत नेले

फलटण : खरा पंचनामा

गांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांना फरपटत ओढत नेल्याचा गंभीर प्रकार साखरवाडी (ता. फलटण) येथे घटला आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

तसेच या मोटारीतून पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा जप्त केला आहे.

गोपाळ बदने असे जखमी पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साखरवाडी येथे एक मोटारीतून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी ही मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने मोटार थांबवली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने चालक आणि त्याचा सहकाऱ्याकडे चौकशी करत होते. यावेळी मोटारचालकाने गाडी पुढे पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या दरवाजामध्ये उपनिरीक्षक बदने यांचा हात अडकला होता. चालक त्यांना तसेच पुढे घेऊन गेला. यामुळे उपनिरीक्षक बदने गंभीर जखमी झाले.

तरीही पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर ही मोटार एका खांबाला धडकली. गाडी चालक पळून गेला तर गांजाची वाहतूक करणारा संशयित मोटार धडकल्याने गंभीर जखमी झाला. उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना उपचारासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गांजाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी पकडले आहे. लक्ष्मण रामू जाधव (पिलीव ता. माळशिरस) असे त्याचे नाव आहे. लक्ष्मण जाधव गंभीर जखमी असल्याने त्यालाही सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर यापूर्वी गांजाच्या वाहतुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. चालक रणजित जाधव फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. फरार चालकाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.