बुधगावमध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीम मशीन फोडून 17.34 लाखांची रोकड लंपास
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीम मशीन फोडून १७ लाख ३४ हजारांची रोकड अज्ञातानी लंपास केली. गॅस कटरने मशीन तोडण्यात आल्याने मशीनचा काही भाग जळला. बुधवारी पहाटे ही घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरावर काळा रंग फासला होता. तसेच चोरीनंतर संशयित अलिशान गाडीतून पसार झाले. संशयितांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे दोन आणि एलसीबीची दोन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. याप्रकरणी एटीएम केंद्राच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कोल्हापूर येथील निशा कंपनीचे पर्यवेक्षक संभाजी मारुती चव्हाण (रा. फुलेवाडी, रिंग रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
बुधगाव येथील बस स्टॉपजवळ बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या एसटीएम मशीनमध्ये तीन दिवसांपूर्वीच वीस लाखांची रक्कम भरण्यात आली होती. आज बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे चारचाकीतून एटीएमजवळ आले. चोरट्यांनी चेहऱ्यावर काळा मास्क लावला होता. याठिकाणी असणारे सीसीटीव्हीवर काळा रंग स्प्रेने फासला. त्यानंतर एटीएमचे मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख ३४ हजार ४०० रूपयांची रोकड काढून घेतली.
एटीएम मशीन फोडताना चोरट्यांनी एटीएम केंद्राला असणारे शटर लावले होते. परंतू आत प्रवेश केल्यानंतरचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. चोरीनंतर चोरट्यांनी अलिशान गाडीतून जतच्या दिशेने पळ काढला. ही घटना सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्याठिकाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात. ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. सहायक फौजदार मेघराज रूपनर तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.