पोलीस उपनिरीक्षकावर 30 हजारांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
मारामारीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे प्रथम ६० हजारांची लाच मागून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीच्या वेळी ३० हजार रुपयांवर तडजोड करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे असे या पोलीस अधिकार्याचे नाव आहे काळे हे सध्या हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ३० वर्षाच्या महिलेने तक्रार केली होती. तिच्या पतीविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांना अटक करुन न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांची कारागृहात रवानगी झाली होती. त्यांना या गुन्ह्यातून जामीन मिळण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी सांगितले आहे. या जामीन अर्जावर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे याने म्हणणे सादर करण्यासाठी ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याची तक्रार या महिलेने १५ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पंचासमक्ष याची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी त्याने तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही. त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने दत्तात्रय काळे याच्याविरुद्ध बुधवारी १४ मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात लाच मागितल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.