'निवृत्तीनंतर अधिकाराचे पद स्वीकारणार नाही'
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणतेही अधिकाराचे पद स्वीकारणार नाही असे न्या. संजीव खन्ना यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोजित एका समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. आपण निवृत्तीनंतर कायद्याशी संबंधित कामामध्येच कार्यरत राहू असे त्यांनी या समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोजित एका समारंभामध्ये त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी नियोजित सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई आणि न्या. संजय कुमार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी न्या. खन्ना यांच्यासह त्यांचे काका आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एच आर खन्ना यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. न्या. भूषण गवई यांनीही निवृत्तीनंतर अधिकाराचे पद स्वीकारणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.
न्या. खन्ना यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. मंगळवारी निरोप समारंभानंतर न्या. खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "मी तिसरा डाव खेळणार आहे आणि मी कायद्याशी संबंधितच काहीतरी करेन. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवृत्त न्यायाधीशांनी लवाद म्हणून काम करण्यास पसंती दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. यशवंत वर्मा यांच्या घरी रोकड सापडल्यासंबंधीच्या वादाबद्दल विचारले असता, न्या. खन्ना म्हणाले की, न्यायाधीशांनी निर्णायक आणि निर्णयात्मक विचार केला पाहिजे. आम्ही दोन्ही बाजू पाहतो आणि प्रकरण काय आहे ते ठरवतो. त्यानंतर आम्ही विविध घटकांचा तर्कसंगतपणे विचार करतो, त्यामुळे आम्हाला अचूक निर्णय घेण्यात मदत होते.
न्या. गवई आणि मी एकाच वर्षात सर्वोच्च न्यायालयात आलो. आम्ही न्यायवृंदामध्ये एकत्र होतो. त्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये आमचा संवाद झाला. मला खात्री आहे की, न्या. गवई हे उत्कृष्ट सरन्यायाधीश असतील. ते सर्वोच्च न्यायालयाची मूल्ये, मूलभूत अधिकार आणि संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांचे पालन करतील याची मला खात्री आहे, असेही न्या. खन्ना म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.