कोयता गँगचा धाक दाखवून पोलिसांकडूनच २५ तोळ्यांचा अपहार
चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
पुणे : खरा पंचनामा
कोयता गँगमधील सराइतांनी चोरलेले सोने खरेदी केल्याचा आरोप करून पोलिसांनीच कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाकडून २५ तोळे दागिच्यांचा अपहार केल्याची घटना घडली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी चौघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हवालदार महेश गाढवे, सर्फराज देशमुख, शिपाई संदीप साळवे, सोमनाथ कांबळे अशी कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सराफ व्यावसायिक कपिल मफतलाल जैन (रा. बल्लारी, कर्नाटक) यांनी याबाबत तक्रार दिली होती. चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस कर्मचारी गाढवे, देशमुख, साळवे, कांबळे कर्नाटकातील बल्लारी शहरात गेले होते. चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती. सुवर्णहार जैन यांच्याकडे गहाण ठेवण्यात आला होता. सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला तीस हजार रुपये दिल्याची कबुली जैन यांनी दिली होती. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकावले. 'तुझ्याकडे आणखी १०० तोळे सोने असून, ते चोरांकडून घेतले आहे. तू ज्यांच्याकडून सोने घेतले आहे. ते चोरटे कोयता गँगमधील असून, त्यांनी पोलिसांवरदेखील हल्ला केला आहे,' असे सराफ व्यावसायिक जैन यांना सांगण्यात आले. तडजोडीत जैन यांनी बल्लारीत तपासासाठी आलेल्या पोलिसांना २५ तोळे सोन्याचे दागिने दिले.
जैन यांच्याकडील सोने घेऊन वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुण्यात आले. जैन यांनी बल्लारीतील पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली. तेव्हा 'अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल झाला नाही,' असे वानवडी पोलिसांनी त्यांना सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून सोनेही जप्त केले नसल्याचे त्यांना समजले. पोलीस कर्मचारी गाढवे, देशमुख, साळवे, कांबळे यांनी सोने वाटून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जैन यांनी पोलिसांत तक्रार दिली. वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी चौघांची चौकशी केली. चौकशीत पोलीस कर्मचारी दोषी आढळले.
'अशा कृत्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील दोन वर्षे तुमची वेतनवाढ का रोखू नये?', अशी नोटीस बजाविण्यात आली, तसेच चौघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.