Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षक जबाबदार!चौकशी अहवालात ठपका : बाळ चोरी प्रकरण

मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षक जबाबदार!
चौकशी अहवालात ठपका : बाळ  चोरी प्रकरण

मिरज : खरा पंचनामा

मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमधील तीन दिवसाच्या बाळाच्या अपहरण प्रकरणी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय समितीचा चौकशी अहवाल बुधवारी प्रभारी अधिष्ठातांकडे सादर करण्यात आला. रुग्णालयातील बाळाच्या चोरीच्या घटनेस तेथील सुरक्षारक्षक जबाबदार असल्याचा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

मिरज सिव्हिलमधून बाळाच्या चोरीप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे डॉ. प्रियांका राठी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीचा अहवाल बुधवारी प्रभारी अधिष्ठातांना सादर करण्यात आला आहे. रुग्णालयातून बाळ चोरून नेण्यास प्रसूती वॉर्डातील व मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक जबाबदार असल्याचा चौकशी समितीने निष्कर्ष काढला आहे. पाच सुरक्षारक्षक व काही परिचारिका यांनी हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव ९ मेपर्यंत सुटीवर असून या अहवालावर कारवाईचा निर्णय डॉ. गुरव घेणार असल्याचे सांगण्यात आले.

मिरज सिव्हिलमधून कोळे (ता. सांगोला) येथील कविता आलदर या महिलेचे तीन दिवसाचे बाळ सारा साठे या महिलेने पळवून नेले होते. गांधी चौक पोलिसांनी सारा साठे व नवजात बालकास सावळज (ता. तासगाव) येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सिव्हिल प्रशासनास सादर करण्यात आला.

दोषींवर कारवाईसोबत रुग्णालयात सीसीटीव्ही वाढवावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पासची अंमलबजावणी काटेकोर करावी, वॉर्डाबाहेर आवारात कोणीही येऊन झोपू नये, यासाठी तेथे झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेगळ्या रंगाचा पास द्यावा. नवजात बाळाला तपासणीसाठी कोठेही बाहेर पाठवण्यात येऊ नये. एमआरआय, सोनोग्राफी यासारख्या तपासणीसाठी रुग्णालय कर्मचारी सोबत असावा, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.