"ऑपरेशन सिंदूरसाठी कुंकू पाठवलंय "
पाचोरा : खरा पंचनामा
प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते. लग्नानंतर फिरायला जाणे आणि आनंदाने जीवन जगणे हे सगळ्यांनाच हवे असते. पण जवान मनोज पाटील यांच्या बाबतीत वेगळे घडले.
५ मे रोजी त्यांचे लग्न झाले आणि अवघ्या तीन दिवसांत, ८ मे रोजी त्यांना तातडीने देशसेवेसाठी हजर राहण्याचा आदेश आला. कोणताही विचार न करता, मनोज पाटील आपल्या अंगावरची हळद आणि हातावरची मेहंदी तशीच ठेवून आज (८ मे) कर्तव्यासाठी रवाना झाले.
देशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलावण्यात आले आहे. जवानांनीही आपल्या वैयक्तिक स्वप्नांपेक्षा देशाच्या कर्तव्याला अधिक महत्त्व देत ८ मे रोजी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाची सुंदर स्वप्ने, पत्नीसोबत फिरण्याचे बेत आणि भविष्याच्या योजना बाजूला सारून, ५ मे रोजी विवाहबंधनात अडकलेले मनोज ज्ञानेश्वर पाटील (रा. खेडगाव नंदीचे) हे आपल्या अंगावर हळदीचा रंग असतानाच देशासाठी सीमेवर निघाले आहेत.
नाशणखेडे (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची मुलगी यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज याचे लग्न ठरले होते. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे विवाह सोहळा नुकताच पार पडला आणि लगेचच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचा आदेश आला.
कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा करत असतानाच देशसेवेसाठी जाण्याचा मनोज यांना अभिमान आहे. 'देशापेक्षा मोठे काहीही नाही,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मनोज यांची पत्नी यामिनी यांनीही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे, घरी परतलेल्या जवानांना पुन्हा आपल्या कर्तव्यावर जावे लागत आहे. यातच स्वतःच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेले मनोजदेखील हातावरची मेहंदी आणि अंगावरची हळद अशा स्थितीत आज देशासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.