Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित

विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित

ठाणे : खरा पंचनामा

मासुंदा तलाव भागात मुंबईतून जेवणासाठी आलेल्या एका विवाहित जोडप्याला धमकावून त्यांच्यापैकी पुरुषाकडून ४० हजार ५०० तर महिलेकडून १० हजार असे ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

यातील दोघे कर्मचारी मुख्यालयातील असून ते पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट वाहनावर नेमणूकीला होते. तर महिला कर्मचारी ही डायघर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच तिघांवरही तडकाफडकी निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल जयेश आंबिकर, राकेश कुंटे (दोघेही नेमणूक मुख्यालय, ठाणे शहर) आणि सोनाली मराठे (शीळ डायघर, पोलीस ठाणे) अशी निलंबित केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना २ मे रोजी प्रशासनाच अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी निलंबित केले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंबिकर, कुंटे आणि मराठे यांनी ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव भागात जेवणासाठी गेलेल्या मुंबईतील एका विवाहित दाम्पत्याला धमकावले. त्यांना एका पांढऱ्या स्कॉर्पिओत बसवून 'इकडे लफडे करायला मुलीला घेऊन येतो का?' तुझ्या आई वडिलांचा नंबर दे, असे म्हणत यातील पुरुषाला हाताने मारहाण केली. यासाठी त्यांनी पोलिस आयुक्तांच्याच एस्कॉट वाहनाचा वापर केला.

एका हॉटेलमध्ये हे जोडपे जेवणासाठी आल्यानंतर त्यांना पोलिसांच्या या पथकाने अडविले. कारवाई न करण्याच्या बदल्यात यातील पुरुषाकडून ४० हजार ५०० रुपये मुंब्रा भागातील एका व्यक्तीच्या गुगल पे वर ट्रान्सफर करण्यास लावले. तर त्यांच्या पत्नीला मीनाताई ठाकरे चौक येथील एका एटीएम केंद्रात नेऊन डेबिट कार्डद्वारे तिच्याकडून १० हजार रुपये रोख जबरदस्तीने घेतले.

कोणताही कसूर नसताना अशाप्रकारे लुटणाऱ्या त्रिकुटाविरुद्ध या जोडप्याने त्याच रात्री नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पैसे खासगी व्यक्तीला गेले. मात्र पैसे घेणारे हे पोलिसच आढळले. त्यानंतर या जोडप्याने पोलिस तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, या प्रकाराची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांना चौकशीचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले. त्याच चौकशीच्या आधारे या तिघांनाही गुन्हेगारी स्वरुपाचे गंभीर स्वरुपाचे कृत्य केल्याच्या तसेच पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा आणणारे कृत्य करुन पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याने निलंबित करण्याचे आदेश दिले.

घडलेला प्रकार खरा आहे. चौकशीनंतर यातील पोलिसांनी जबरदस्तीने घेतलेली रक्कमही परत केली. त्यामुळे यातील पिडित दाम्पत्याने तक्रार दिली नाही. मात्र, या पोलिसांवर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई झाल्याच्या वृत्ताला नौपाडा पोलिसांनी दुजोरा दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.