आयुक्तांचा मेसेज हुक्का पार्लरचालकाला पाठवून सावध करणाऱ्या पीएसआय, पोलिसाला शिक्षा
पुणे : खरा पंचनामा
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील ११ ठिकाणी कारवाई करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचा मेसेज हुक्का पार्लर चालविणाऱ्यांना देऊन सावध करणारा पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार यांना अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी शिक्षा दिली आहे.
परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक विशाल शिवाजी पवार आणि पोलीस अंमलदार हरिचंद्र राजाराम पवार अशी त्यांची नावे आहे. दोघांना सध्या निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कसुरीबद्दल सेवेतून बडतर्फ का करु नये, अशी शिक्षेची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या खुलासा अंशतः समाधानकारक असल्याने त्यांची प्रस्तावित शिक्षा कमी करुन ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हा वानवडी पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीला होते. त्यांना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात आले होते. २६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री वानवडी, कोंढवा, काळेपडळ, लष्कर, कोरेगाव पार्क व विमाननगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अवैध हुक्का पार्लर सुरु असल्याचा संदेश मिळाला होता. पोलीस आयुक्तांनी ११ हुक्का पार्लर व रेस्टारंटची नावे नमूद केलेला मेसेज सर्व अधिकाऱ्यांना पाठवून त्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. विशाल पवार हा प्रशिक्षणासाठी रामटेकडी येथे असतानाही त्याने हा मेसेज विजेता हॉटेलचे मालक व चालक राहुल सुरेखा जैनसिंघाल यांना पाठविला. त्यामुळे ते सतर्क होऊन हुक्का सर्व्हिस बंद करीत असताना पोलिसांची रेड झाली. विशाल पवार याने मेसेज देऊन सावध केले व ते विशाल पवार याला महिन्याला २० हजार रुपये देत असल्याचे जबाबात त्यांनी सांगितले होते.
पोलीस मार्शल हरि पवार यानेही राहुल जैनसिंघाल यांना फोन करुन सावध करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते उचलू शकले नाही. वार्षिक वेतन वाढ स्थगित करण्याबाबत त्यांना नोटीस दिली होती. त्यांचा खुलासा अंशतः समाधानकारक असल्याने त्यांची शिक्षा कमी करुन दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात येत असल्याचा आदेश अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.