लॉकरमधून दागिने गहाळ झाल्यास बँक जबाबदार
चोरीला गेलेले दागिने परत करण्याचा ग्राहक आयोगाचा आदेश
पुणे : खरा पंचनामा
बँक कर्मचाऱ्याने बनावट चावीचा वापर करून लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरल्यानंतर जबाबदारी झटकणाऱ्या बँकेला ग्राहक आयोगाने तडाखा दिला. ग्राहकाच्या लॉकरमधून दागिने चोरीला जाणे किंवा गहाळ होणे याला बँक जबाबदार असल्याचे स्पष्ट करून ग्राहक आयोगाने महिला ग्राहकाचे चोरलेले ८० ग्रॅम दागिने परत करण्याचा आदेश बँकेला दिला.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे आणि सरिता पाटील यांनी याबाबतचा आदेश दिला. ग्राहकाला झालेला मानसिक त्रास, तसेच तक्रार खर्चापोटी ३५ हजार रुपये बँकेने द्यावे, असाही आदेश देण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने एका सहकारी बँकेविरुद्ध ग्राहक आयोगात तक्रार दिली होती.
तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात राहायला आहेत. त्यांनी अॅड. ज्ञानराज संत यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी २५ एप्रिल २०११ रोजी बँकेची लॉकर सुविधा घेतली होती. त्यानंतर त्या कामानिमित्त लंडनला रवाना झाल्या होत्या. त्यानंतर सप्टेंबर २०१२ मध्ये बँकेतील एका कर्मचाऱ्याने बनावट चावीचा वापर करून महिलेचे लॉकर उघडले. महिलेच्या लॉकरसह अन्य लॉकरमधून ८७ लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले होते.
जानेवारी २०१३ मध्ये लंडनहून पुण्यात परतल्यानंतर त्यांना लॉकरमधील ८० ग्रॅम वजनाच्या पाटल्या चोरीला गेल्याचे लक्षात आले. बँकेतील कर्मचाऱ्याने अपहार केला असून, दागिने परत मिळतील, असे बँकेकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बँकेला पत्र पाठवून प्रचलित दरानुसार गहाळ झालेल्या दागिन्यांचे पैसे देण्याची मागणी त्यांनी केली. त्या वेळी हे प्रकरण फौजदारी असल्याने न्यायालयात प्रलंबित असल्याचे बँकेने सांगितले. बँकेने जबाबदारी न घेतल्याने महिलेने ग्राहक आयोगात धाव घेऊन तक्रार दिली.
बँक कर्मचाऱ्याने लॉकरमधून दागिने चोरले. ग्राहकाच्या लॉकरची जबाबदारी बँकेवर आहे. कर्मचाऱ्याने केलेल्या अपहाराची जबाबदारी बँकेला झटकता येणार नाही. दागिने सुरक्षित राहावेत, यासाठी ग्राहकाने बँकेकडून सशुल्क लॉकर सुविधा घेतली होती, असे ग्राहक आयोगाने स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.