गुंड गजा मारणेसाठी बिर्याणी ऑर्डर करणाऱ्याला अटक !
पुणे : खरा पंचनामा
तुरुंगात असलेल्या गुंड गजा मारणेसाठी बिर्याणी ऑर्डर करणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बुधवारी कोथरुड इथून अटक केली. हा तरुण मारणे टोळीचा सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. या तरुणाला अटक केल्यानंतर त्यानं मारणेला कशी मदत केली याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यावरुन गुंड मंडळी तुरुंगात पोलिसांच्या ताब्यात असतानाही कशी बाहेरुन सुत्र चालवतात याचा हा एक प्रकारे पुरावाच असल्याचं बोललं जात आहे.
विशाल धुमाळ (वय ४०) असं या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री कोथरूड इथून त्याला अटक केली. त्यानं या वर्षीच्या सुरुवातीला येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सांगली कारागृहात बदली करताना गुंड गजानन मारणेला मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या ताफ्याच्या प्रवासादरम्यान मारणे आणि त्याच्या साथीदारांसाठी बिर्याणीची पार्टी दिल्याचा आरोप धुमाळवर आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ३ मार्च २०२५ रोजी गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात हालवत असताना आरोपी धुमाळ हा पुणे-सातारा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये आपल्या साथीदारांसह थांबला होता. या ठिकाणी त्यानं आपल्या सहकाऱ्यांसाठी मटण बिर्याणीची ऑर्डर दिली होती. त्याचबरोबर याच हॉटेलमधून त्यानं गजा मारणेसाठी देखील मटण बिर्याणी विकत घेतली आणि ती नंतर मारणेला पोलीस व्हॅनमधून नेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आली," अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितलं.
धुमाळला ताब्यात घेतल्यानंतर अशा गोष्टींचा खुलासा झाला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी असंही सांगितलं की, मारणेला दुसऱ्या तुरुंगात नेत असताना पोलीस व्हॅनच्या मागून एक आलिशान कार पुढे निघून गेली. या कारमध्ये मारणे गँगचे लोक होते. त्यामुळं या गँगमधील लोकांचा आणि पोलिसांच्या टीममधील कोणी संपर्कात होते का? याचा तपास केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.