एमपीएससीकडून 'पीएसआय' परीक्षेचा निकाल जाहीर
आतिश मोरे राज्यात प्रथम
नागपूर : खरा पंचनामा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात आतिश मोरे यांनी सर्वाधिक गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती देण्यात आली. एमपीएससीने पीएसआय संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेतली होती. उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. त्यानुसार एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली. सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. अंतिम निकालापूर्वी पडताळणी केल्यानंतर काही उमेदवारांच्या शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू व अनाथ प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून पडताळणीच्या अधीन राहून त्यांचा प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधिन राहून जाहीर करण्यात येत आहे. उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खेळाडूव अनाथ प्रवर्गातील संवर्गाची तात्पुरती निवड जाहीर होईल. त्यानंतर या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची शिफारशी करण्यात येतील, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरता भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेतला होता. आता या पर्यायाच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. आता उमेदवारांची तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्या आधारे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना सात दिवसाचा कालावधी देण्यात येतो.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.