पंचकल्याण पूजेच्या गर्दीत दागिने चोरणाऱ्या चार महिलांना अटक
जयसिंगपूरच्या दोघींचा समावेश, दागिने जप्त : सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील दुधगाव येथे झालेल्या पंचकल्याण पूजेवेळी गर्दीत महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या चार महिलांना अटक करण्यात आली आहे. तीन महिला कोल्हापूर जिल्ह्यातील असून दोघी जयसिंगपूर येथील आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त केल्याची माहिती सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.
लक्ष्मी बाळू सकट (वय ३४, रा. घर नं १० इ वॉर्ड राजेंद्र नगर झोपड्डी पट्टी ता. करवीर जि. कोल्हापुर), सौ. दिपाली किशोर काळे (वय ४०, रा. मालु हायस्कुलजवळ संभाजी नगर जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर), सौ. सोनु हरि काळे (वय ३५, रा. चाल्मिक आवास ५० नं ब्लिडींग, सांगली), सौ. शारदा बंटीनाथ हातळगे (वय ४५, रा. जयसिंगपुर, नांदणी रोड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. दुधगाव येथे 8 मे दरम्यान पंचकल्याण पूजा झाली. या पूजेसाठी बोलवाड येथील शकुंतला पाटील गेल्या होत्या. जेवून झाल्यावर हात धूत असताना त्यांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्यात आले. याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना निरीक्षक चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
पथक चोरट्याचा शोध घेत असताना उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, हवालदार मेघराज रुपनर यांना काही महिला चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी बुधगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह सापळा रचून महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी दुधगाव येथील पूजेवेळी दागिने चोरल्याची कबुली दिली. दागिने जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.
सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, मेघराज रुपनर, अभिजीत पाटील, बंडु पवार, सचिन कोळी, मनोज निळकंट, हीम्मत शेख, महीला पोलीस अंमलदार मनिषा कोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.