शिरोळ येथे विट भट्टी मजुराचा खून
मृत निलजी बामणीचा
जयसिंगपूर : खरा पंचनामा
शिरोळ येथील कनवाड रस्त्यावर शेतातील बांधकामाच्या ठिकाणी अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वीट भट्टी कामगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी सांगितले.
राजू दिलीप कोलप (वय 40 रा. निलजी बामणी ता. मिरज जि. सांगली) असे खून झालेल्याचे नाव आहे. शिरोळ-कनवाड रस्त्यावरील आण्णासो महात्मे यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासमोर त्यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी सायंकाळी महात्मे कुटुंबातील व्यक्ती जनावरांचे चारापाणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती झोपल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता. सदर व्यक्तीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार झालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्यास दिली.
दरम्यान कोलप वीट भट्टी कामगार असल्याचे स्पष्ट झाले. तो निलजी बामणी येथील असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हल्लेखोरांचा तसेच खुनाच्या कारणाचा शोध सुरु असल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.