"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फेर प्रभाग रचना करा"
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे. आयोगाने या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले होते. राज्यात पाच वर्षापेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहे. ओबीसी आरक्षणाबाबत २०२२ मध्ये सादर झालेल्या बांठीया आयोगाच्या अहवालाआधी जे प्रमाण होते, त्यानुसारच आरक्षण देण्यात यावे, असेही स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाहीस सुरूवात केली आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश बुधवारी आयोगाने दिले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झेडपी गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आता प्रभाग रचना आणि ग्रामीण भागात गट आणि गणांच्या फेर रचनेचे काम युद्धपातळीवर हातात घ्यावे लागणार आहे.
कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला. याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्य कांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.