महाविद्यालयीन तरुणाला धमकावून पैसे मागणारे पोलीस निलंबित
पुणे : खरा पंचनामा
मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.
पोलीस कर्मचारी दयानंद शिवाजी कदम, अश्विन ईश्वर देठे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे ५० हजारांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पोलीस कर्मचारी कदम आणि देठे यांची चौकशी केली. त्यांचे वर्तन बेशिस्त, अशोभनीय, बेजबाबदारपणाचे आहे. अशा वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचा ठपका ठेऊन कदम आणि देठे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त जाधव यांनी दिले.
येरवड्यातील कॉमर झोन कंपनीच्या रस्त्यावर २४ एप्रिल रोजी सायंकाळी तरुण-तरुणी गाडी बाजूला गप्पा मारत थांबले होते. सायंकाळी सातच्या सुमारास गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देठे आणि कदम तेथे आले. त्यांनी मोटारीत अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तरुणाकडे ५० हजार रुपये मागितले होते. तक्रारदार तरुण एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्या दिवशी तो येरवड्यातील एका डॉक्टरांकडे आला होता. घाबरलेल्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी चौकशी करुन दोघांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिला होता.
याप्रकरणात पोलीस कर्मचारी दोषी आढळले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.