... म्हणून तिने चोरले बाळ!
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी फिरली गावे : पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे झाली माय-लेकराची भेट
सांगली : खरा पंचनामा
मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून तीन दिवसांचे बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक केल्यावर धक्कादायक बाबी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर येत आहेत. बाळ चोरल्यानंतर पकडले जाऊ नये यासाठी तिने अनेक गावे फिरली. तसेच सिसिटीव्हीपासून वाचण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे तिचा ठावठिकाणा सापडला अन 48 तासांच्या आत माय-लेकराची भेट झाली.
मिरज सिव्हिलमध्ये सांगोला येथील कविता आलदर प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यांनी गोंडस मुलाला जन्मही दिला. आलदर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून संशयित सारा साठे त्यांच्या सोबतच वावरत होती. काही वेळातच तिने कविता यांचा चांगलाच विश्वास संपादन केला. कविता शेजारच्या रुग्णांना सारा माझी चुलत बहीण असल्याचे सांगत होती. त्यामुळे साराचा प्रसूती कक्षातील प्रवेश सुकर झाला होता. त्यामुळे ती कक्षात सहज वावरत होती. त्यानंतर तिने बाळाला डोस पाजण्याचा बहाणा करून बाळ घेऊन निघून गेली.
बराच वेळ ती परत न आल्याने कविता आणि त्यांच्या पालकांचा संशय वाढला. तोपर्यंत सारा बाळ घेऊन पसार झाली होती. याची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेज तपासून तपासाला गती दिली. या गंभीर घटनेमुळे एलसीबीचे पथकही तिचा शोध घेत होते. जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा साराचा शोध घेत होती.
सुटीवर असूनही सहायक निरीक्षक संदीप शिंदे झाले ऍक्टिव्ह
ही घटना घडण्यापूर्वी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सुटीवर गेले होते. ठाण्याचा चार्ज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सुनील गिड्डे यांच्याकडे आहे. या घटनेमुळे सुटीवर असलेले शिंदे ऍक्टिव्ह झाले. त्यांनी ठाण्यातील अंमलदारांना तपासाच्या सूचना दिल्या. साराचे फोटो सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकमधील मित्रांना पाठवून महिलेबाबत माहिती देण्यास सांगितले. त्यांच्या माहितीनुसार एका टीमने गेल्या आठवड्यातील तासगाव बस स्थानकावरील सिसिटीव्ही फुटेज मिळवले. त्यात साराच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तासगाव तालुक्यासह सोलापूर, कराड, सातारा, सोलापूर जिल्ह्यात तिचा शोध सुरु झाला. मात्र श्री. शिंदे यांना ती सावळज येथे गेल्या दीड वर्षांपासून रहात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने तेथे पथक पाठवून तिला ताब्यात घेण्यात आले. बाळ सुखरूप असल्याचे पाहून पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला.
साराकडील चौकशीत धक्कादायक माहिती समोर
सराकडे मंगळवारी पोलिसांना केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. साराचे माहेर राजापूर (ता. शिरोळ) येथील आहे. तिचा पहिला विवाह निमशिरगांव येथील एकाशी झाला होता. पहिल्या पतीपासून तिला तीन मुली आहेत. त्या तीनही मुली तिच्या पहिल्या पतीजवळ राहतात. त्यातील मोठया मुलीचे लग्न झाले असून दुसऱ्या मुलीचं लग्न काही दिवसात आहे. दरम्यान पहिल्या पतीशी वाद झाल्यानंतर ती दोन वर्षांपासून रुकडी (ता. हातकणंगले) येथे बहिणीकडे रहात होती. त्यावेळी तिचे इचलकरंजी येथील नातेवाईकांकडे येणे जाणे होते. त्यावेळी तिचा दुसऱ्या पतीवर जीव जडला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही दिवसांनी साराने आपण गर्भवती असल्याचे दुसऱ्या पतीला सांगून लग्नाची गळ घातली. पण मुलाच्या घरचा विरोध असल्यामुळे दोघे पळून सावळज (ता. तासगाव) येथे गेले. तेथे त्यांनी मंदिरात लग्नही केले. दुसऱ्या पतीला गर्भवती असल्याचे सांगितल्याने ती त्याला घेऊन रुग्णालयात जात होती मात्र त्याला बाहेरच थांबवत होती. काही दिवसांपूर्वी ती मिरज सिव्हिल मध्ये दाखल झाली होती. मात्र तिचा गर्भपात झाला होता. त्याचवेळी दुसऱ्या पतीसमोर बिंग फुटू नये तसेच त्याने सोडू नये यासाठी ती गर्भवती असल्याचे नाटक करत होती.
मिरज सिव्हिलमधून बाळ चोरल्यानंतर ती रिक्षाने अंकली (ता. मिरज) येथे गेली. तिथून ती रुकडी येथे गेली. त्यानंतर दुसऱ्या पतीला फोन करून मुलगा झाल्याचे सांगितले आणि न्यायला रुकडी येथील रुग्णालयात येण्यास सांगितले. दुसरा पती कार घेऊन तिला न्यायला गेला. नंतर ती त्याच्यासोबत बाळाला घेऊन सावळज येथे गेली. मात्र पोलीस गतीने तपास करत तिच्यापर्यंत पोहोचलेच.
दुसऱ्या पतीने सोडू नये यासाठीच तिने बाळ चोरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील चौकशीत आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.