विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला; आटपाडीतील दोघांना अटक
16.80 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कुमठे फाटा ते तासगाव रस्त्यावर विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो पकडून आटपाडी तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 11.80 लाखांची दारू, टेम्पो असा 16.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अक्षय प्रदिप वाघमारे (वय २०), नानासाहेब आंनदा पाटील (वय ५१, दोघे रा.आटपाडी, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात बेकायदा दारूची विक्री, साठा, वाहतूक, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील अतुल माने यांना कुमठे फाटा ते तासगाव रस्त्यावर एका टेम्पोमधून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता.
कुमठे फाटा परिसरात माहितीप्रमाणे टेम्पो (एम एच १० डी.टी. ७२०५) तेथे आल्यावर पथकाने तो अडवला. त्याची तपासणी केल्यावर त्यामध्ये विदेशी दारू तसेच बियरचे बॉक्स सापडले. त्याची किंमत 11.80 लाख रुपये आहे. याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी ही दारू मिरज येथील संगम वाईन शॉप येथून घेऊन आटपाडी येथे घेऊन निघाल्याची कबुली दिली. त्यानंतर टेम्पोमधील दोघांना अटक करून दारू जप्त करण्यात आली. मुद्देमालासह दोघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, नितीन सावंत, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिद्ध खोत, अनंत कुडाळकर, रणजित जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुशांत चिले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.