रात्री कारमध्ये मैत्रिणीसोबत दिसला, तरुणाला एटीएममध्ये नेऊन 20 हजार उकळले, दोन पोलीस निलंबित
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहरात मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला धमकावून 20 हजार रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण देत परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुण त्याच्या मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्रगस्तीवर होते. ते दोघेही तेथे आले. त्यांनी तरुणाला तुमच्याबद्दल तक्रार आली आहे, पोलिस ठाण्यात प्रकरण न्यायचे नसेल तर 20 हजार रुपये दे, अशी मागणी केली. तरुणाजवळ सहाजिक एवढे पैसे नव्हते. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणास दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून 20 हजार रुपये काढून घेतले.
या सगळ्याच घडलेल्या प्रकराने घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली. या प्रकाराबाबत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देणे आवश्यक होते, तरीही त्यांनी तसे केले नाही. त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून दोघांचे निलंबन केल्याचा आदेश पोलिस उपायुक्त पिंगळे यांनी दिले. गणेश देसाई आणि योगेश सुतार अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.