विहीर खुदाई प्रस्तावासाठी 4 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक
आळते येथे सांगली एसीबीची कारवाई : उपाधीक्षक कटके
सांगली : खरा पंचनामा
विहीर सिंचन खुदाईचा प्रस्ताव पाठवण्यासाठी, त्याचा कार्यारंभ आदेश काढणे, हा प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना आळते (ता. तासगाव) येथील ग्रामसेवकाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) सांगलीचे उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली.
आलीम यासिन मुजावर (वय 38) असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या वडिलांचा नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर सिंचन खुदाई प्रकल्प प्रस्ताव मंजूर आहे. त्या प्रस्तावाचा प्राथमिक प्रस्ताव पाठवण्यासाठी, त्याचा कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तसेच त्याची पुढील मस्टर मागणीसाठी आणि तो प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने सांगलीतील एसीबीकडे तक्रार दिली होती.
त्याची गुरुवारी पडताळणी केल्यावर मुजावर याने 4 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे यांच्यासह अंमलदारांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.