Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भीमाशंकरच्या झटपट दर्शनासाठी एजंटाने केली पंतप्रधान मोदींच्या नातेवाईकांची लूट

भीमाशंकरच्या झटपट दर्शनासाठी एजंटाने केली पंतप्रधान मोदींच्या नातेवाईकांची लूट

मंचर : खरा पंचनामा

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची वेगवेगळ्या माध्यमातून लूट केली जाते. त्याचा प्रत्यय अनेकदा भाविकांना येत असतो. त्यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरातील सदस्यांनाही या लुटारू एजंटांनी सोडले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावजय, पुतणी व जावई हे दर्शनासाठी आले असतांना त्यांच्याकडूनही झटपट दर्शनासाठी सुमारे पंधराशे रुपये घेतले. हा गंभीर प्रकार मंगळवार (दि.१७) रोजी घडला.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे एसटी बसस्थानकासमोर पोलिसांचे बॅरेकेट लावून बसलेल्या खासगी एजंटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून एक हजार रूपये घेवून मंदिराकडे सोडले आणि मंदिराकडे घेवून जाणाऱ्या मोटार सायकलस्वाराने त्यांच्याकडे दर्शनासाठी पाचशे रूपयांची मागणी केली असल्याचे सोनल मोदी यांनी सांगत नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील पुतणी, भावजय, जावई तसेच सोनल प्रल्हाद मोदी, ज्योतिबेन मोदी, विराग मोदी, नतनाबेन मोदी यांनी कोणतीही शासकीय सुविधा न घेता दर्शन घेतले. सोनल मोदी यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांची भावजय वयोवृध्द असल्याने आणि चालताना त्यांना थकवा येत असल्याने त्यांनी एजंटाबरोबर झालेली तडजोड स्वीकारत एक हजार रुपये दिले.

त्यानंतर एजंटांने बॅरेकेट बाजूला केले. त्यांना मंदिर रस्ता दाखवण्यासाठी मोटार सायकल स्वारास पाठविले. त्यानेही मंदिराजवळ गेल्यानंतर दर्शनासाठी पाचशे रूपयांची मागणी केली. मात्र, त्यास पैसे दिले नाही. मंदिरामध्ये जाण्यासाठी अगोदरच मंदिरातील गुरूजींना माहिती दिली असल्याने मंदिरात कुणी पैसे मागितले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी सांगितले.

घोडेगाव येथील हरिश्चंद्र मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी हरिश्चंद्र मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळे, राजेश काळे, अॅड. संजय आर्विकर, गजानन काळे उपस्थित होते.

सोमवार दि. १६ रोजी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आले असता पोलीस प्रशासनाने सर्व व्यवस्थित असल्याचे भासविले. परंतु ते गेल्यानंतर लगेच पुन्हा श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची आर्थिक लुटमार चालू झाली.

श्री क्षेत्र भीमाशंकरहून घोडेगाव येथे बुधवार (दि.१८) सकाळी श्री क्षेत्र हरिश्चंद्र मंदिर येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन व जलाभिषेक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्ति आले असता त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना क्षेत्र भीमाशंकर येथे आर्थिक लुटमार होत असलेल्या घटनेबाबत माहिती देत खंत व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.