जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवरच बसले; ४० पैकी ३० कर्मचारी गैरहजर
गैरहजर कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
सरकारी कार्यालयांतील उशिरा येण्याच्या सवयीला चाप लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनोखी शक्कल लढवली. शुक्रवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर स्वतः खुर्ची टाकून हजेरी रजिस्टर हातात घेऊन ते बसले आणि उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.
सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३ कर्मचारी कार्यालयात हजर होते, तर ४० पैकी ३० कर्मचारी गैरहजर होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय घेतला असून, त्याची नोंद सर्व्हिस बुकमध्ये होणार आहे.
फुलंब्री तहसील कार्यालयातील भूमी अभिलेख, सहाय्यक निबंधक, पुरवठा, दारूबंदी आणि कृषी विभागातील अनेक कर्मचारी गैरहजर आढळले. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. त्यांच्या या धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांनी याला पाठिंबा दर्शवताना सरकारी कर्मचाऱ्यांवरील संताप व्यक्त केला आहे. "कर्मचाऱ्यांनी वेळेत येऊन नागरिकांची कामे मार्गी लावावीत," अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.
यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सरकारी कार्यालयांतील लालफितीचा कारभार आणि वेळ न पाळण्याच्या सवयीमुळे नागरिक त्रस्त आहेत. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या या कृतीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कर्मचाऱ्यांना वेळेचे भान ठेवण्याचा इशारा मिळाला आहे. यामुळे इतर कार्यालयांमध्येही अशा कारवाया होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, प्रशासनाने यापुढेही कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.