पोलिस निरीक्षकांनी मागितले अडीच लाख रुपये, अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी?
श्रीगोंदे : खरा पंचनामा
तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी गंभीर गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासाठी अडीच लाखांची मागणी केल्याची व पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार फिर्यादी संदेश दिवटे यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे. यामुळे भंडारे अडचणीत आले आहेत.
पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार, फिर्यादीचे मामा व चुलत मामांमध्ये जमिनीच्या कारणातून आपसात वाद होते. ८ मे रोजी फिर्यादी हे त्याच्या भावासह घोटवी (ता. श्रीगोंदे) येथे वाहन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी मामा आणि चुलत मामामध्ये वाद होऊन त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत फिर्यादी आणि त्याचा भाऊ आदेश याला काहींनी हल्ला करीत जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार बेलवंडी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत नंतर किरकोळ गुन्हा दाखल करून घेतला.
कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. समोरच्या लोकांनी तीन लाख रुपये दिलेले आहेत, तू पैसे न दिल्यास तुझ्या भावावर खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याबाबत गेल्या पंधरा दिवसांत त्यांची दुसऱ्यांदा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार गेली आहे. त्यामुळे भंडारे यांच्यावर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.