Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटकसात जिवंत काडतुसांसह २२ तोळे सोने सापडले

एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक
सात जिवंत काडतुसांसह २२ तोळे सोने सापडले

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगर येथील बंगल्यातील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी तथा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली.

तिच्याकडून पोलिसांनी घरातील तुळशी वृंदावनाच्या खाली जमिनीत हातमोजामध्ये लपवून ठेवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी रोहिणी बाबूराव खोतकर (वय ३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) हिस मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संभाजी पवार यांनी दिली.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार लड्डा यांच्या बंगल्यात १५ मेच्या रात्री सहा दरोडेखोरांनी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी लुटली. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. एपीआय रविकांत गच्चे यांनी २६ मे रोजी साजापूर रस्त्यावर अमोलचे एन्काउंटर केले होते. खोतकरची बहीण रोहिणी हिच्या चौकशीत तिने पडेगाव येथील गॅरेजसमोर लावलेल्या कारच्या डिकीत चांदी असल्याचे सांगितले होते. तेव्हा पोलिसांनी ३१ किलो चांदी जप्त केली होती. अमोलची मैत्रीण खुशीच्या चौकशीत तिने रोहिणीकडे सोन्याचे दागिने असल्याचा जबाब पोलिसांना दिला होता.

खोतकरचा मित्र आणि आरोपी सुरेश गंगणे आणि रोहिणीच्या एका मैत्रिणीनेदेखील दागिने तिच्याकडेच असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी रोहिणीला चौकशीसाठी बोलावले होते. ती १८ जून रोजी मोबाइल बंद करून गोव्याला निघून गेली. गोवा आणि कर्नाटक येथे वास्तव्यास असलेला तिचा मित्र रणजितकडे तिने दागिने दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गोवा आणि कर्नाटक येथे तपासाला जाणार आहेत. दरम्यान, रोहिणीने नवीन सीमकार्ड घेतले. तिने तीन संशयास्पद लोकांना कॉल केल्याचे तपासात समजले. त्यामुळे पोलिसांनी तिला सोमवारी रात्री अटक करण्याचा निर्णय घेतला. एपीआय जयश्री कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या परवानगीने तिच्या अटकेची प्रक्रिया पार पाडली. मंगळवारी रोहिणीला न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अमोलकडे दोन पिस्तुले होती. त्यातील एकातून त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. ते पिस्तूल पोलिसांनी यापूर्वीच जप्त केले. कुख्यात दरोडेखोर सुरेश गंगणेचा मित्र राजेश साठे याला दोन दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर त्याच्याकडूनही ४ तोळे सोने जप्त केले. गुन्हे शाखेने आतापर्यंत ७९४ ग्रॅम सोने, ३२ किलो चांदीचे भांडे, ८ लाख रुपये रोख, ३ चारचाकी व एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.