स्क्रॅपच्या आडून सव्वाकोटी रुपयांच्या 'एमडी' ड्रगची तस्करी : तिघांवर गुन्हा
एनडीपीएसच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
साजापूर गावाच्या चौफुलीवर अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाकडून (एनडीपीएस) दोन ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेले १ कोटी २३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन पावडर) जप्त करण्यात आले होते. या जप्त पावडरची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर तीन आरोपींविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
आरोपींमध्ये ट्रक चालक सफीकुर रहेमान तफज्जुल हुसेन (रा. तिरथ, उत्तर प्रदेश), राज रामतिरथ अजुरे (रा. तिरथ) आणि स्क्रॅपचा मालक बबन खान (रा. साजापूर) यांचा समावेश आहे. एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने साजापूर चौफुली परिसरात शनिवारी आयशर ट्रक एमएच ०४ बीयु ५१६० आणि एमएच ०४ ईवाय ९९७७ थांबवून जप्त केले होते. या वाहनांमध्ये स्क्रॅपच्या मालामध्ये पांढरे पावडरसदृश रसायन व द्रव असलेले रसायन होते. त्याच वेळी सोमवारी पथकास मिळालेल्या माहितीनुसार साजापूर परिसरातील गोडाऊन येथे छापा मारल्यानंतर त्यामध्येही स्क्रॅप मालामध्ये पांढरे पावडरसदृश रसायन सापडले. या रसायनाची शासकीय ड्रग चाचणी कीटद्वारे तपासणी केल्यानंतर त्यात एमडी तथा मेफेड्रॉनसदृश अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत एकूण २ किलो ४७३ ग्रॅम वजनाची एमडी किंवा मेफेड्रॉन पावडर, दोन आयशर ट्रक, असा एकूण १ कोटी ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सपोनि मनोज शिंदे, उपनिरीक्षक म्हस्के, हवालदार लालाखान पठाण, अमलदार संदीप धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे, शिल्पा तेलोरे यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.