पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा बडतर्फ पोलीस अधिकारी पळाला
अहिल्यानगर : खरा पंचनामा
अत्याचाराच्या घटनेतील पीडित महिला व तिच्या लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे व तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी व पुणे पोलीस दलातील बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सुनील लक्ष्मण लोखंडे (वय ५२, वानवडी, पुणे) याने आज, मंगळवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यातून, जिल्हा सरकारी रुग्णालयातून पलायन केले.
यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली. ही घटना आज, मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. त्याच्या तपासासाठी तोफखाना व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील लोखंडे याच्याविरुद्ध एका महिलेने अत्याचाराची तक्रार केली होती. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात पीडित महिलेने जबाब देण्यापूर्वीच तिला व तिच्या दोन मुलींना धमकावण्यासाठी लोखंडे ७ ऑक्टोबर २०२१ रोजी तिच्या घरी गेला. त्याने त्याच्याकडील रिवॉल्व्हरचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व त्यांना घरात ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी लोखंडे याने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथक पीडितेच्या घरी पोहोचून तिच्या मुलांना सुरक्षित बाहेर काढत असताना उपअधीक्षक मिटके व लोखंडे यांच्यामध्ये झटापट झाली होती. त्यात लोखंडे याने गोळी झाडली. मात्र, सुदैवाने उपअधीक्षक मिटके यांनी ती चुकवली. या घटने संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यात लोखंडे याला अटक करण्यात आली होती व सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या सहा दिवसांपासून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात स्वतंत्र कोठडी आहे, मात्र त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सर्जिकल वार्डमध्ये नेण्यात आले होते. तेथे पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त होते. त्यांना गुंगारा देत लोखंडे याने पळ काढला. या संदर्भात पोलीस अंमलदार संजय वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.