तुझी नोकरी अन् आयुष्य उध्वस्त करून टाकू !
पोलीस निरीक्षक, कॉन्स्टेबलची कर्मचारी पोलीस हवालदाराला धमकी, कर्मचारी हवालदार बेपत्ता
बारामती : खरा पंचनामा
पुणे ग्रामीण पोलीस दलात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज (१० जून) पहाटेपासून शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले असून, या प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आणि पत्नीला पाठवलेला कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ समोर आल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झालं आहे.
या चिठ्ठीत केमदारणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मागील दोन महिन्यांपासून या अधिकाऱ्यांनी माझा मानसिक छळ केला. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. माझं आयुष्य आणि नोकरी उद्ध्वस्त करीन, अशा शब्दांत धमकावलं," असं केमदारणे यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.
चिठ्ठीव्यतिरिक्त, विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांना एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ पाठवला आहे. या ऑडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, "माझ्या या अवस्थेला पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत." हे विधान केवळ आत्महत्येच्या शक्यतेकडेच नव्हे, तर संपूर्ण प्रकरणातील संभाव्य दुर्दैवी परिणामांकडेही निर्देश करतं.
या घटनेनंतर प्रियंका केमदारणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात आपल्या पतीच्या बेपत्तेची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित करत "खात्याच्या बाहेर जाऊन तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमक्या का दिल्या?" असा थेट आरोप केला आहे. तसंच, "माझ्या पतीला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल," असा इशाराही दिला आहे.
विष्णू केमदारणे हे आधी इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, २७ एप्रिल रोजी त्यांचा पदभार काढण्यात आला आणि भिगवण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. तथापि, त्यांनी भिगवण पोलीस ठाण्याकडे रूजू न होता पदभार स्वीकारला नव्हता, हे देखील या प्रकरणात महत्त्वाचं आहे. या प्रकरणावर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, विष्णू केमदारणे बेपत्ता असल्याने आणि त्यांनी चिठ्ठीत थेट आरोप केल्याने, पोलिस यंत्रणा आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू करत असल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, केमदारणे यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रकार केवळ पोलीस दलातील अंतर्गत मानसिक छळाचा नमुना आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा शोध घेणं अत्यावश्यक ठरत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.