मिरजेतील तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर येथील बस स्थानक परिसरात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या मिरजेतील एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
जिलानी मकबुल नरगुंद (रा. चांद कॉलनी म्हैशाळ रोड मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. इस्लामपूर परिसरात बेकायदा अग्नीशस्त्रे बाळगणारे, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक हारूगडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. बस स्थानक परिसरात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती निरीक्षक हारूगडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने तेथे जाऊन तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ पिस्तूल सापडले. ते जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद जाधव, अरुण कानडे, अमोल सावंत, दिपक घस्ते, विशाल पांगे, शशीकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.