पालकमंत्री वाद : रायगड शिवसेनेच्या हवाली, नाशिक राष्ट्रवादीकडे?
मुंबई : खरा पंचनामा
महायुती सरकारमध्ये गेले कित्येक महिने चर्चेचा विषय ठरलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हं आहेत. शिवसेनेने रायगड स्वतःकडे ठेवत नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची तयारी दाखवली असून, यामुळे महायुतीतील तणाव काहीसा शमण्याची शक्यता आहे.
महायुती सरकार स्थापनेनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. परिणामी, दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, पालकमंत्री पदावरील वाद अधिक गहिरा झाला आहे. वेळेत तोडगा न निघाल्यास मतदारांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने, शिवसेनेने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शिवसेनेने रायगडवर दावा कायम ठेवत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ हे नाशिकचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते असल्याने, गिरीश महाजन यांच्या तुलनेत अधिक प्रभावी पर्याय म्हणून त्यांची नावे पुढे येत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील दादा भुसे नाशिकच्या, तर भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते. नियुक्त्या झाल्यावर नाराजीचा सूर उमटला आणि त्यानंतरच वादाने रांग धरली. सध्या रायगड एकनाथ शिंदे आणि नाशिक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असल्याने दोन्ही पदांवर शिवसेनेकडून जोरदार दावा केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.