Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उच्च न्यायालयाने आंबेडकरांची याचिका फेटाळली; विधानसभेतील मतदानावर घेतला होता आक्षेप

उच्च न्यायालयाने आंबेडकरांची याचिका फेटाळली; विधानसभेतील मतदानावर घेतला होता आक्षेप

मुंबई : खरा पंचनामा

नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर विरोधक सातत्याने वाढीव मतदानाचा आरोप करत निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधींही वाढीव मतदानावरून निवडणूक आयोगावर टीका करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर वाढीव मतदान झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दोन दिवसांपूर्वीच संपली होती आणि आज निकाल लागणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाश आंबेडकरांची याचिका फेटाळली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाख लोकांनी मतदान झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत असल्याचे सुनावणीवेळी नमूद केले होते. तसेच विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय सायंकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचा व्हिडीओ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दोन दिवसांपूर्वीच संपली होती. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून निकाल 25 जून जाहीर होणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निकाल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ यांच्या खंडपीठाने प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. आंबेडकरांची याचिका ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर वरील न्यायालयात दाद मागणार का? हे पाहावे लागेल.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. त्यांनी एकदिवसापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत 8 टक्क्यांनी मतदार वाढले असल्याचा दावा केला होता. राहुल गांधींच्या या दाव्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 8 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि त्यापैकी अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.