गुन्ह्यांची व्याप्ती वाढल्याने प्रशिक्षण केंद्रामध्ये मिळालेल्या ज्ञानासह आणखी ज्ञान वृद्धींगत करावे
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांचे प्रतिपादन
तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ४७६ प्रशिक्षणार्थी महिला पोलीसांचे दीक्षांत संचलन उत्साहात
तासगाव : खरा पंचनामा
सध्याचे गुन्ह्यांचे स्वरुप, व्याप्ती व जटिलता यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स्, सोशल मिडिया, डीप-फेक, डार्क वेब यांचा उपयोग करुन आरोपी हे गुन्हे करीत आहेत. त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण केंद्रामध्ये मिळालेले ज्ञान याबरोबरच आणखी ज्ञान वृद्धींगत करावे लागणार आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) प्रविणकुमार पडवळ यांनी केले.
तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सत्र क्रमांक १० मधील ४७६ प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार यांचा दीक्षांत संचलन आज सोमवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानिरीक्षक पडवळ बोलत होते. दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे श्री. पडवळ यांनी मानवंदना स्विकारली. प्रशिक्षणार्थीनी दिमाखदार संचलन केले.
परेड कमांडर नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार/१३३ अंजली महेंद्र यादव, भरती जिल्हा रत्नागिरी यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी प्रशिक्षणार्थीनी नुकत्याच संमत झालेल्या भारतीय न्याय संहीता, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता व भारतीय साक्ष संहीता याचे अद्ययावत याचे प्रशिक्षण घेतलेले असून या कायद्यांच्या अंमलबजावणीत ते महत्वपुर्ण भुमिका बजावतील याची खात्री असलेबाबत मत व्यक्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच यापुढे भविष्यात येणा-या प्रशिक्षणार्थीकरीता निधी उपलब्ध करुन देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, प्रशिक्षणार्थीना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला प्रशिक्षणार्थी यांचे सत्र क्र १० हे १० ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु झाले होते. त्यामधील ४७६ प्रशिक्षणार्थी महिला पोलीस या पोलीस दलात रुजू होण्यासाठी सर्वाथाने सज्ज झाल्या आहेत. या सत्रामध्ये समाविष्ट असलेल्या ४७६ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी या ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नाशिक शहर, छ. संभाजी नगर, छ. संभाजीनगर ग्रामीण, धाराशिव, अमरावती शहर, नागपूर शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगांव, नंदुरबार, बीड, वाशिम, बुलडाणा, नांदेड, लातुर, परभणी, नागपूर ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, लोहमार्ग-पुणे अशा एकूण २७ पोलीस घटकांमधून आलेल्या आहेत.
या प्रशिक्षण सत्राचा कालावधी ०९ महिन्यांचा होता. सदर ०९ महिन्यांच्या कालावधीत त्यांना वेगवेगळे फौजदारी कायदे, कायदा व सुव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलीस प्रशासन तसेच भावनिक प्रज्ञावंत या विषयांचे सखोल ज्ञान देण्यांत आले आहे. तसेच बाहयवर्गातील शारिरीक कवायत प्रशिक्षण, परेड, पोलीस खात्यातील वेगवेगळया हत्यारांचे प्रशिक्षण, गोळीबार सराव, कमांडो प्रशिक्षण व योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षणाअंती, ४७६ प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थीचा चषक चंद्रकला रावसाहेब जाधव, भरती जिल्हा छ. संभाजी नगर शहर या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी पटकावला. सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी उपविजेता, आंतरवर्ग सर्व विषयात प्रथम तसेच विषय क्रमांक १ ते ३ मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेली प्रशिक्षणार्थी असे तिन्ही चषक कु. किशोरी संजय शेलार, भरती जिल्हा मिरा भाईंदर या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी पटकावला. वाह्यवर्ग सर्व विषयात प्रथम राणी सुरेश वाढई, भरती जिल्हा बुलढाणा, सर्वोत्कृष्ठ गोळीबार मिना भास्कर मेंगाळ, भरती जिल्हा रायगड, पी. टी. मधील सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी शिवाणी चंद्रकांत चौगले रायगड, सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशिक्षणार्थी सोनाली नवनाथ पवार छ. संभाजी नगर शहर, कमांडो कोर्स सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी कोमल बाबुराव सावते रत्नागिरी, सर्वोत्कृष्ठ शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव - रत्नागिरी, विषय क्र.४ ते ८ मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त प्रशिक्षणार्थी कु. भारती हेमराज राऊत नागपूर शहर याप्रमाणे महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी चषक पटकावले. सदर विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमुख पाहुणे यांचे हस्ते चषक प्रदान करण्यात आले. संचलनानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना कर्तव्याची शपथ दिली तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अहवाल वाचन केले.
दीक्षांत संचलन उत्कृष्ठरित्या पार पाडल्याबद्दल प्राचार्य धीरज पाटील व सर्व पोलीस अधिकारी, प्रशिक्षक तसेच सर्व महिला प्रशिक्षणार्थीचे महानिरीक्षक पडवळ यांनी अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, तासगावचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे व इतर मान्यवर तसेच प्रशिक्षणार्थीचे नातेवाईक, उप-प्राचार्य (प्रशासन) राजश्री पाटील, उप-प्राचार्य (प्रशिक्षण) सुनिल शेटे, सर्व आंतरवर्ग व बाहयवर्ग अधिकारी, प्रशिक्षक, मंत्रालयीन कर्मचारी, सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार उपप्राचार्य (प्रशासन) राजश्री पाटील यांनी मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.