Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेल्वे स्थानकात पोलिसाकडूनच महिलेचा विनयभंग; वर्षभरानंतर गुन्हा दाखल

रेल्वे स्थानकात पोलिसाकडूनच महिलेचा विनयभंग; वर्षभरानंतर गुन्हा दाखल

मुंबई : खरा पंचनामा

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या रेल्वे पोलिसाविरोधात अखेर वर्षभरानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेने सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित रेल्वे पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी जूनमध्ये रेल्वे स्थानकातील फलाटावर ही घटना घडली होती.

गुजरातमधील वलसाड येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ती जून २०२४ मध्ये गेली होती. पुन्हा नागपूरला जाण्यासाठी ती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात आली होती. रात्री उशीर झाल्याने ती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याच्या बाहेरील बाकावर एकटीच ट्रेनची वाट बघत बसली होती.

रात्रपाळीसाठी कार्यरत पोलीस हवालदार चांगदेव कराळे (५४) याने मध्यरात्री २ च्या सुमारास तिला पाहिले. तिची चौकशी केल्यावर ती एकटीच असल्याचे त्याला समजले. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे महिलेला धक्का बसला. तिने नकार दिला. त्यावेळी कराळे याने तिच्याशी लगट केली. हा प्रकार तेथून जाणाऱ्या एका प्रवाशाने पाहिला आणि त्याला हटकले. यानंतर इतर पोलीस जमा झाले, मात्र या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर ही महिला निघून गेली. तक्रार नसल्याने कराळे याच्यावर कारवाई करता आली नाही, परंतु त्याला तात्पुरते निलंबित करून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

दरम्यान, ही महिला सोमवारी अचानक आपल्या वडिलांबरोबर सीएसएमटी पोलीस ठाण्यात आली आणि तिने घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली. एक वर्षापूर्वी चांगदेव कराळे याने कशाप्रकारे असभ्य वर्तन करून विनयभंग केला त्याची सविस्तर माहिती दिली. त्या प्रकाराने मी प्रचंड धक्क्यात होते आणि घाबरलेले होती. असा प्रकार अन्य कुणा महिला प्रवासासोबत भविष्यात होऊ नये, यासाठी मी हिंमत करून तक्रार करण्यासाठी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आणि कराळे याच्याविरोधात भारतीय दंड विधानसंहितेच्या कलम ३५४ आणि ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. महिलेच्या तक्रारीवरून आम्ही पोलीस हवालदार चांगदेव कराळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.