Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोकलिंगम अन् किरण कुलकर्णीची नार्को करा, मतांच्या चोरीचं सत्य उघड होईलकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं खुलं आव्हान

चोकलिंगम अन् किरण कुलकर्णीची नार्को करा, मतांच्या चोरीचं सत्य उघड होईल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं खुलं आव्हान

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधीयांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत. त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्प आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा म्हणजे महाराष्ट्रातील मतांच्या चोरीचं सत्य उघड होईल, असं खुलं आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लेखावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व भाजपा युती हीच मतांच्या चोरीचे लाभार्थी आहेत, ते आरोपी आहेत. सत्तेचा मलिदा लाटत आहेत आणि तेच उत्तरे देत आहेत. तुम्ही रामशास्त्री प्रभुणेंच्या अविर्भावात वावरू नका, तुमचा कारभार तर घाशीराम कोतवालचा आहे. फडणवीस यांनी दिलेली उत्तरे ही थातूरमातूर आहेत.

फडणवीस हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. वेगळा विदर्भझाल्याशिवाय लग्न करणार नाही. अजित पवार व राष्ट्रवादी बरोबर कधीच जाणार नाही. छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांची जागा जेलमध्येच आहे हे सांगणारे, नारायण राणेंवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे हे तेच फडणवीस आहेत जे आज अजित पवार, नारायण राणे व भुजबळांना शेजारी घेऊन बसले आहेत. आता चक्की पिसिंग, पिसिंग नाही तर त्यांच्यासोबतच मिक्सिंग व फिक्सिंग सुरू आहे. भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचीट देण्यात ते पटाईत आहेत. आता तर त्यांनी निवडणूक आयोगालाही क्लिनचीट देऊन टाकली, त्यामुळे संशय अधिक बळावला आहे. 'दाल में कुछ काल नही' तर सर्व दाळच काळी आहे, असा घणाघात सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी आजपर्यंत ज्या मुद्द्यांची मांडणी केली ते काळाच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर शंका उपस्थित होत आहेत. लोकशाही व्यवस्थेचा हा प्रश्न आहे. त्या शंकांचे निरसन करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे पण आयोग उत्तर देत नाही. सीसीटीव्ही फुटेज देत नाही, उलट नियम बदलून टाकले. निवडणूक आयुक्त नियुक्तीवर फडणवीस बोलले पण काँग्रेसच्या काळातच टीएन शेषन आयुक्त झाले त्यांनी आचारसंहिता काय असते ते दाखवून दिले.

पण भाजपाच्या मोदी सरकारने तर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती पॅनलमधून सरन्यायाधीश यांना वगळून आपल्याच एका मंत्र्यांची त्या जागी वर्णी लावली हे सांगण्यास फडणवीस विसरले आहेत. फडणवीस यांचा लेख हा सारवासारव करणारा आहे. कदाचित दिल्लीतील आकाने सांगितल्याने हा लेखप्रपंच केला असावा. त्यांच्या लेखाला लेखाने उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यावर एखाद्या चारोळीतूनच उत्तर दिले जाऊ शकते, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.