Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून...'

'वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून...'

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.

वारी मार्गावर वारकऱ्यांचे जोरदार स्वागत होत असून, शासनाकडूनही त्यांच्या सोयीसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या भक्तिमय वातावरणात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूचे अनेक सण रस्त्यावर साजरे केले जातात. मात्र अशावेळी मुस्लिम समाज हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही. मात्र मुस्लिम समाज दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तरी तक्रारी केल्या जातात, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आझमींच्या विधानाला भाजपप्रेरित असल्याचा आरोप केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या वादात उडी घेत चांगलंच फटकारलं आहे.

"अबू आझमींना वारकरी संप्रदायाची खरी माहितीच नाही," असं म्हणत मुश्रीफ म्हणाले, "वारी ही वर्षातून एकदाच होते, तर नमाज दिवसातून पाच वेळा. नमाज अशा जागी पढली पाहिजे की इतरांना त्रास होऊ नये. वारीसाठी सरकारने नवीन पालखी मार्ग तयार केले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांविषयी गैरसमज पसरवू नये, असं अबू आझमी भेटले तर नीट समजावून सांगेन, असं त्यांनी म्हटलं आहे. या विधानामुळे अबू आझमींच्या वक्तव्यावर आणखी टीका सुरू झाली असून, धार्मिक समजूतदारपणा आणि सहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.