Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिक्षकांना आता निवडणूक ड्युटी ऑनलाईन; शाळेत पूर्णवेळ करावे लागणार काम

शिक्षकांना आता निवडणूक ड्युटी ऑनलाईन; शाळेत पूर्णवेळ करावे लागणार काम

मुंबई : खरा पंचनामा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिकेतील शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांनी दैनंदिन कामकाजावर परिणाम न होऊ देता तसेच मुळ आस्थापनेतून कार्यमुक्त न होता, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच निवडणुकीशी संबंधित कामे ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात रुजू होण्याची आवश्यकता नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले होते. या अनुषंगाने, जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने महानगरपालिका आयुक्त यांनी, मुंबई शहर जिल्हा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले होते.

या पार्श्वभूमीवर, मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांसाठीदेखील शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून वेळोवेळी जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच धर्तीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

परंतु, नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांनी मुळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता त्यांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ऑनलाइन पद्धतीने निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रुजू होण्याची गरज नाही. तसेच, या कामकाजासाठी आयोगाच्या नियमांप्रमाणे मानधन दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.