बायकोचा साबण वापरला, नवऱ्याला पोलिसांनी धु.. धु... धुतले!
अलिगढ : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये घडलेल्या एका घटनेची तिथल्या नागरिकांमध्ये इतकी चर्चा सुरू आहे की ती करता करता नागरिकांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे. अलीगडमध्ये राहणाऱ्या 39 वर्षांच्या माणसाला पोलिसांनी अटक केली होती.
मात्र त्याला अटक करण्याचे कारण हे सगळ्यात महत्त्वाचे होते आणि हेच कारण सध्या तिथे चर्चेचा विषय बनले आहे. या माणसाला बायकोचा साबण वापरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. आपला साबण नवऱ्याने वापरल्याचे कळाल्यानंतर बायकोने थेट पोलिसांत धाव घेतली आणि नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. शुक्रवारी पोलिसांनी नवऱ्याला बायकोने केलेल्या तक्रारीच्या आधारे अटक केली. अटक झाल्यानंतर पोलिसांनी आपली बिनपाण्याने धुलाई केल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे. तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे की तिचा नवरा तिला सतत त्रास देत होता. तो तिला मारहाण करायचा आणि शिवीगाळही करत होता आणि यामुळे ती कंटाळलेली होती.
अनेक घरांत लहानसहान कारणांवरून नवरा बायकोत भांडणे होत असतात. कारण शुल्लक असलं तरीही ही भांडणे होत असतात. अलीगडमध्ये घडलेली ही घटना त्यापैकीच एक म्हणावी लागेल. प्रवीण कुमार (आरोपी) याने बायकोला न वापरता तिचा साबण वापरला होता. हे त्याच्या बायकोला कसं कळालं हे माहिती नाही मात्र तिला आपला साबण नवऱ्याने वापरल्याचे कळाले तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यानंतर तिचे आणि नवऱ्याचे कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके वाढले की पोलिसांना बोलवावे लागले. प्रवीण कुमारच्या बायकोने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रवीण कुमारविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी प्रवीण कुमारला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी आपली जाम धुलाई केली असा आरोप प्रवीण याने केला आहे.
प्रवीणने म्हटले की आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येताच बायकोने भांडण करायला सुरुवात केली. 'माझा साबण का वापरलास?' असा प्रश्न विचारत ती वाद घालू लागली होती. प्रवीण कुमारने बायकोला प्रश्न विचारला होता की तू इतरवेळी माझ्या वस्तू वापरतेस तेव्हा मी कधीच आक्षेप घेतला नाही आता मी तुझा साबण वापरला तर हरकत काय आहे असा सवाल प्रवीणने विचारला होता. यानंतरही बायकोने वाद घालणं सुरू ठेवलं आणि पोलिसांना बोलावण्यात आले असं प्रवीणने सांगितले. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि पोलीस ठाण्यात गेल्यानंतर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली असे प्रवीणने म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.