Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाणिज्य वकिलातीच्या सुरक्षेस तैनात चार पोलिसांचे निलंबनअधिकाऱ्याच्या भेटीवेळी अनुपस्थित राहणे भोवले

वाणिज्य वकिलातीच्या सुरक्षेस तैनात चार पोलिसांचे निलंबन
अधिकाऱ्याच्या भेटीवेळी अनुपस्थित राहणे भोवले

मुंबई : खरा पंचनामा

वाणिज्य वकिलातीच्या सुरक्षेसाठी तैनात असताना कर्तव्याच्या वेळात अनुपस्थित असलेल्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकाऱ्याने अचानक तेथे भेट दिली. त्यावेळी रात्रपाळीला तैनात दोन पोलीस शिपाई व सकाळी कर्तव्यावर येणारे दोन पोलीस शिपाई यांपैकी कोणीच उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याप्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोलीस शिपाई विठ्ठल लक्ष्मण शेळके, प्रसाद राजेंद्र बनकर, बालाजी समोजी वसावे व शुभम ज्ञानेश्वर हरचकर यांना एका बंद असलेल्या वाणिज्य वकिलातीच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यातील शेळके व बनकर हे १६ जून रोजी रात्रपाळीला तैनात होते. तर, त्याच ठिकाणी १७ जून रोजी सकाळी वसावे व हरचकर यांना कर्तव्य देण्यात आले होते. सुरक्षेच्या ठिकाणी तैनात पोलिसांच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अचानक अशा ठिकाणांना भेट देतात. त्यानुसार १७ जूनला सकाळी पाऊणे आठच्या सुमारास सुरक्षा अधिकाऱ्याने तेथे भेट दिली. त्यावेळी तेथे कोणीच उपस्थित नसल्याचे आढळले. त्यांनी आजूबाजूला तपासले व माहिती घेतली असता तेथे कोणीच उपस्थित नसल्याचे दिसून आले. तसेच शस्त्र ठेवण्यात आलेल्या खोलीची चावीही बाजूला अडवून ठेवण्यात आली होती. सकाळी तेथे कामावर तैनात पोलीस शिपाई बसावे व हरचकर उशीराने म्हणजे सव्वा आठच्या सुमारास उपस्थित झाले. याबाबतच्या नोंदी सुरक्षा अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यांनी सशस्त्र दलाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर या चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कारवाई झालेले चारही पोलीस सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे सशस्त्र पोलीस दल-३ येथील उपायुक्तांकडून पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याबाबतचे आदेश चारही पोलिसांना देण्यात आले. रात्र पाळीला त्या ठिकाणी दोन पोलीस शिपाई तैनात होते. तर सकाळी दोन पोलीस शिपायांना तेथे तैनात करण्यात आले होते. वास्तविक सकाळी कर्तव्यावर येणारे पोलीस तेथे आल्याशिवाय रात्रपाळीच्या पोलिसांना कर्तव्याचे ठिकाण सोडता येत नाही. पण रात्रपाळीचे दोन्ही पोलीस शिपाई तेथून निघून गेले. तसेच सकाळचे पोलीस शिपाई उशीरा हजर झाले. सर्वांत गंभीर बाब म्हणजे शस्त्र ठेवलेल्या खोलीची चावीही आपल्यानंतर तैनात पोलिसाकडे सुपूर्त करूनच निघायचे असते. पण सुरक्षा अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान चावी खोलीच्या बाजूला अडवकून ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.