Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराचा खून

आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराचा खून

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात शनिवारी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास घडली आहे. हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (50, रा. चिंचडगाव) असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हभप संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या. संगीताताई पवार यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने वार केल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते. त्यांनी हभप संगीताताई पवार यांना आवाज दिला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले.

यावेळी हभप संगीताताई पवार या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत भाऊ कृष्णा पवार म्हणाले की, महाराज या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली दोन वर्ष वृंदावनला राहिलेल्या आहेत. वृंदावनला राहून भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या येथे आल्या. त्यानंतर त्यांनी कीर्तनास सुरुवात केली. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की, मी घरी येणार नाही. आश्रमासाठी पंधरा वर्षांपूर्वी जागा घेतलेली होती. त्या दोन महिन्यापासून येथे स्थायिक झाल्या होत्या. मी सकाळी शेतामध्ये असताना मला फोन आला की, इथे काहीतरी घडले आहे. इथे येऊन बघितले असता मला संगीताताई महाराज यांची हत्या झाल्याचे समजले, असे त्यांनी सांगितले.

भागवत फुंडे म्हणाले की, संगीताताई पवार या झोपलेल्या असताना कोणीतरी दगडाने त्यांच्या डोक्यात मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलेला आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. समोरच्या मंदिराचं कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले आहे. त्या मंदिरातील काही वस्तू चोरीला गेल्या का? याबाबत तपास केला जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.