'PA, PS अन् OSD' यांच्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे गृह विभागाला आदेश
मुंबई : खरा पंचनामा
काही दिवसांपूर्वी धुळे येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत कोट्यवधी रुपयांची रोख सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकणाची राज्यभरात चर्चा झाली. आमदार सत्ताधारी असल्याने आणि विधिमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख असल्याने सरकारचीही प्रतिमा मलिन झाली. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.
पण या प्रकरणानंतर मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आले आहेत. मंत्री आणि आमदारांचे विशेष कार्य अधिकारी, खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकांच्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे आदेश गृह मंत्रालयातून देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर आता थेट फडणवीस आणि पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
यापूर्वी सरकार स्थापन होतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक नेमताना बरीच काळजी घेतली होती. ज्या अधिकाऱ्यांवर कोणतेही आरोप नाहीत, ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, कार्यक्षमता चांगली आहे, वर्तणूक चांगली आहे अशाच अधिकाऱ्यांची निवड केली होती.
फडणवीस यांच्या या प्रक्रियेवर मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेतला होता. तरीही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. पण धुळे प्रकरणानंतर त्यांनी एक पाऊल पुढे टाकत मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, खाजगी सचिव आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकांवरही नजर ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
गृह खात्याने आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हे अधिकारी गैरव्यवहार करत आहेत का? त्यानी कुठे मालमत्ता घेतल्या आहेत, त्यांचे पैसे ठेवणारे दलाल कोण आहेत, यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांचीही या अधिकाऱ्यांवर करडी नजर आहे. यामुळे मंत्री आणि अधिकारीही धास्तावले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.