कापूरवाडी येथील शेतमजूर महिलेच्या खुनाचा छडा, एकाला अटक
दागिन्यांसाठी खून केल्याचे स्पष्ट : इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यातील कापूरवाडी येथील ओढ्यात महिलेचा खून केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या अंगावरील दागिन्यांसाठी हा खून केल्याची त्याने कबुली दिल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
मुवाज इलाही मुलाणी (वय २१, रा. इदगाह मैदानजवळ इस्लामपुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर हाफिनाजी मदनसाब मुल्ला (वय ६५, रा. शिवनगर इस्लामुपर) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी कापूरवाडी येथील ओढ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेची ओळख पटल्यानंतर निरीक्षक हारूगडे यांनी यातील संशयिताला पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. एलसीबीचे पथकही संशयिताचा शोध घेत होते. हा खून मुवाज मुलाणी याने केल्याची माहिती निरीक्षक हारूगडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली.
त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने मृत महिला ओळखीची असून तिला मजुरीचे काम देतो असे सांगून महिलेला कापूरवाडी येथील ओढा परिसरात नेले. तेथे पाठीमागून तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. नंतर तिच्या अंगावरील दोन तोळ्याचे दागिने घेऊन पळून गेल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण दिडवाघ, जयदीप कळेकर, सागर वरुटे, उपनिरीक्षक सतीश मिसाळ, समाधान घुगे, सागर गायकवाड, अरुण कानडे, अमर जंगम, अमोल सावंत, दिपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे एलसीबीचे सचिन धोत्रे, अरुण पाटील, अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, सुशांत चुले, सायबर पोलीस ठाणेकडील करण परदेशी, अभिजित पाटील, सतिश अलदार, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.