अधिकाऱ्यांनी तासाभरात 13 किलो काजू-बदाम फस्त, 2 किलो तूप केले फस्त!
भोपाळ : खरा पंचनामा
सरकारी अधिकारी आणि त्यांची 'खायची' भूक हा काही नवा विषय नाही. अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण खाबुगिरीचे किस्से सातत्यानं समोर येत असतात. जनतेचा पैसा म्हणजे आपलाच पैसा अशा प्रकारे उधळपट्टी सुरु असते.
मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात मे महिन्यात गावोगावी जल संरक्षणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. जनजागृतीसाठी अभियान चालवण्यात येत होतं. त्यावेळी भदवाही गावात वेगळाच 'खेळ' सुरु होता. त्याचं बिल आता समोर आलं आहे. त्यानुसार अवघ्या एका तासाच्या कार्यक्रमात जिल्ह्याच्या बड्या अधिकाऱ्यांनी १३ किलो सुकामेवा खाल्ला. त्याचं बिल १९ हजार रुपये इतकं झालं आहे.
मध्य प्रदेश सरकारनं पावसाचं पाणी अडवण्यासाठी, ते जिरवण्यासाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 'जल गंगा संवर्धन' अभियान हाती घेतलं होतं. या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील सगळ्या गावांमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये बैठका झाल्या. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना जल संवर्धनाची माहिती दिली. यातून जनजागृती किती झाला नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही. पण सरकारी पैसा मात्र पाण्यासारखा खर्च झाला. गावातील नदी, विहिरी, ओढे कोरडे पडलेले असताना अधिकाऱ्यांच्या टेबलांवर मात्र काजू, बदाम, दूध, तूप आणि फरसाण यांचा रतीब घातला गेला.
शहडोल जिल्ह्यातील भदवाही ग्राम पंचायतीत गेल्याच महिन्यात जल चौपाल आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांना जल संवर्धनाचे धडे देण्याच्या उद्देशानं चौपाल आयोजित केला गेला. पण चौपालच्या नावाखाली अधिकाऱ्यांना सुकामेव्यावर आडवा हात मारला.
अधिकाऱ्यांच्या पाहुणाचारासाठी ५ किलो काजू, ५ किलो बदाम, ३ किलो मनुके, ३० किलो नमकिन, बिस्किटांचे २० पुडे, ६ लीटर दूध, ५ किलो साखर आणण्यात आली. या सगळ्यावर १९ हजार १० रुपये खर्च झाला. यासोबतच अधिकारी २ किलो तूप प्यायले. त्याचं बिल ५ हजार २६० रुपये इतकं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.