'मराठी घरातच बोलायची, अंगणवाडीत चालणार नाही'
कन्नड अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम
बेळगाव : खरा पंचनामा
कन्नड भाषेचा विकास व प्रसार होण्यासाठी तळापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी अंगणवाडी स्तरावरील शिक्षिका व मदतनीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कन्नड बोलणे सक्तीचे करा. तुमची भाषा मराठी असेल तर ती घरात बोलावी. कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन कारवाई करा, अशी सूचना कन्नड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळीमले यांनी अधिकाऱ्यांना केली.
जिल्हा अधिकारी कार्यालयात कन्नड भाषा अनुष्ठानाबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शैक्षणिकदृष्ट्या कन्नड भाषा मागे पडली असल्याचे काही अहवालातून निदर्शनास आले आहे. यासाठी प्रत्येकाने भाषेच्या विकासासाठी कायद्याने लढा दिला पाहिजे. भाषा वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून भाषेचा अधिक वापर करण्यावर भर दिला पाहिजे. शिक्षण खात्याकडून यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. कन्नड भाषेचा सर्वांनी आदर करावा. याबरोबरच सरकारी कार्यालय व शिक्षण क्षेत्रात याचा अधिक वापर करावा. असे त्यांनी सांगितले.
राज्यामध्ये २५ टक्के जनता कन्नड भाषेचा उपयोग करत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तीन महिन्याला कन्नड भाषेसाठी काम करणाऱ्या कन्नड संघटना व संस्थांबरोबर बैठक घेऊन विचारविनिमय करावा, अशी सूचना त्यांनी केली. सीमाभागातील खानापूर तालुक्यामध्ये कन्नडचा अधिक वापर होण्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. याबरोबरच इतर खात्यांतील अधिकाऱ्यांनीही याची दखल घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी उपस्थित असणाऱ्या शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी कन्नड भाषेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली, तर अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या नेमणूक प्रक्रियेची माहिती महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण बोरसे, पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, सीईओ राहुल शिंदे यांच्यासह जिल्हास्तरीय विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी स्तरापासूनच कन्नडचा प्रसार व्हावा यासाठी अंगणवाडीमधील शिक्षिका व मदतनीस यांना कन्नड बोलण्याची सक्ती करण्यात यावी. हे कर्मचारी घरामध्ये मराठी वा इतर कोणतीही भाषा बोलत असले तर ती घरातच बोलावी. अंगणवाडीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी कन्नडमध्येच संवाद साधावा, तरच भाषेचा विकास होईल, असे सांगत कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन सचना करावी. असे परुषोत्तम यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.